बुलडाणा – भरधाव रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेले पाच जण चिरडले गेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील त्रिशरण चौकात घडली. या अपघातातील दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अनिल गंगाराम पडोळकर (वय-29), मायाबाई अनिल पडळकर (वय-30) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर बेबाबाई शेषराव सोळंके, आकाश अनिल पडोळकर, शेषराव लक्ष्मण सोळंके (सर्व रा. पारधीबाब मंदिराजवळ, चिखली) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि जखमी हे घिसडी समाजाचे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून उदरनिर्वाहासाठी शेतीउपयोगी साहित्य विक्री करणारे हे कुटुंब बुलडाणा शहरातील त्रिशरण चौक परिसरात रस्त्याच्या कडेला वास्तव्यास होते. मंगळवारी (16 मार्च) रात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटला आणि रुग्णवाहिका थेट त्यांच्या अंगावर चढली. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात ही रुग्णवाहिका कोलवड येथील योगेश जाधव यांची असल्याचे समजले. पोलिसांनी गाडीसह जाधव यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिकेला भरधाव जाण्याची मुभा असते. मात्र, रुग्णवाहिकांची वेळोवेळी देखभाल, दुरूस्ती करणे महत्वाचे असते. जिल्ह्यातील बऱ्याच रुग्णवाहिकांची स्थिती वाइट असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या देखभालीकडे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे.