अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांची माहिती; पालिका करणार खर्च
प्रकल्प पेटविल्याने कंपनीने विमा नाकारला; परिसरातील उर्वरित जागेचेही संपादन सुरू
पुणे – आंबेगाव बुद्रूक येथे नागरिकांनी कचरा प्रकल्प पेटविल्याचा महापालिकेला तीन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प पुढील दोन महिन्यांत पुन्हा कार्यरत करण्यात येणार असून त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च महापालिका प्रशासन करणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.
हा प्रकल्प पेटविला गेल्याने या प्रकल्पाचा विमा कंपनीने नाकारला असून याची कायदेशीर तपासणी पालिकेच्या विधी सल्लागार विभागाकडून करण्यात येत असल्याचेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडून आंबेगाव येथे 200 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पाच्या तक्रारी करत, या भागातील स्थानिकांनी आंदोलन उभारले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हा कचरा प्रकल्प पेटविण्यात आला होता. या आगीत सुमारे 3 कोटींचे प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान विमा रकमेतून वसूल करून प्रकल्प चालविण्यास देण्यात आलेल्या ठेकेदाराने पुन्हा प्रकल्प सुरू करावा, असे पत्र पालिकेकडून ठेकेदारास देण्यात आले होते.
मात्र, विमा कंपनीने ही आग लागलेली नसून लावण्यात आलेली आहे, तसेच या बाबतची फिर्यादही पोलिसांत असल्याचे सांगत संबंधित कंपनीस विमा देण्यास नकार दिला आहे. अशा पद्धतीने विमा नाकारता येतो का? याबाबत विधी सल्लागार विभागाचा अभिप्राय पालिकेने मागविला आहे. तसेच, त्यानंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकाच निधी देणार असून पुढील दोन महिन्यांत प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.
रस्त्यासाठी भूसंपादन सुरू…
कचरा प्रकल्पाकडे जाणारा रस्ता तसेच प्रकल्प परिसरात कचरा प्रकल्पासाठी आरक्षित असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिली. या प्रकल्पासाठी कचरा घेऊन जाताना नागरीवस्तीत सुरक्षित वाहतूक व्हावी तसेच प्रकल्पाचे काम अधिक क्षमतेने व्हावे यासाठी हे भूसंपादन करण्यात येत असून त्यासाठी जागा मालकांनीही तयारी दर्शविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.