रांजणी, (वार्ताहर) – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे घड्याळ हाती बांधलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आंबेगाव तालुक्यात कमी मतदान झाले.
आढळरावांपेक्षा डॉ. कोल्हे यांना तालुक्यात जास्त मताधिक्य मिळाले. साहजिकच आढळराव यांच्या कार्यकर्त्यांचा वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आढळरावांचे काम केले नसल्याचा आरोप होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आढळरावांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीवरील नाराजीचा फटका वळसे पाटील यांना बसेल का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे लोकसभा निवडणुकीनंतर वळसे पाटील यांच्यापासून चार हात दूर राहत असल्याचे सातत्याने दिसत आहे.
तालुक्यात वळसे पाटील यांच्या राजकीय कार्यक्रमांना आढळराव पाटील हजर राहत नसल्याने आढळराव पाटील यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
साहजिकच येत्या महिनाभरात येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आढळराव यांची आंबेगाव विधानसभा निवडणुकीतील भूमिका वळसे पाटलांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे तालुक्यातील विविध गावात मेळावे, सभा होत आहेत. वळसे पाटलांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर आढळराव पाटील यांचे फोटो देखील झळकताना पाहायला मिळत आहे.
मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमांना आढळराव पाटील उपस्थित नसतात. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पूर्वाश्रमीचे आढळराव पाटलांचे कार्यकर्ते हे द्विधा मनस्थितीत आहेत.
विधानसभेला आंबेगांव तालुक्यात आढळराव यांची नक्की राजकिय भूमिका काय असणार आहे ? हे अद्याप गुलदस्त्यातच असल्याचे गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडीवरून दिसून येते.
तालुक्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर शरद पवारांपासून दूर झालेले वळसे पाटील यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे तालुक्यात वळसे पाटलांच्या दृष्टीने काही अंशी दूषित वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, वळसे पाटील यांना आढळरावांची साथ मिळाली तर वळसे पाटील यांना या विधानसभेतील यश दूर नाही. परंतु आढळराव पाटील वळसे पाटील यांना कितपत राजकीय साथ देतात, यावर बरीचशी तालुक्यातील राजकीय गणिते अवलंबून आहे.
शिंदे गटाच्या हालचाली…
एकूणच आंबेगाव तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या आढळराव पाटलांच्या आगामी काळातील तालुक्यातील राजकीय भूमिकेकडे जनतेच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर आढळराव पाटील हे वळसे पाटील यांच्या सार्वत्रिक आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे आढळराव पाटलांचे कार्यकर्ते आणि स्वतः आढळराव पाटील यांची राजकीय भूमिका विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवाराच्या दृष्टीने निर्णायक ठरणार हे मात्र तितकेच खरे आहे.