मंचर – आदिवासी भागातील जनतेसाठी आपण जाणीवपूर्वक शासनाच्या अनेक योजना आणल्या. आदिवासी जनतेला चांगला लाभ होत आहे. गेले ३५ वर्ष आदिवासी बांधवांनी मला मोलाची साथ दिली. या पुढील काळात देखील आपण आदिवासी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटीबद्ध राहू, अशी ग्वाही आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार, दि.१ रोजी सकाळी श्री.क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाला भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर कोंढवळ येथे झालेल्या कोपरा सभेत वळसे पाटील बोलत होते.
याप्रसंगी आदिवासी नेते सुभाष मोरमारे, माजी उपसभापती संजय गवारी, रूपाली जगदाळे नंदकुमार सोनावले, प्रकाश घोलप इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले, सविता दाते, मारुती लोहकरे, नितीन लोहकरे, पांडूरंग काटे, आनंद राक्षे, संतोष राक्षे, तानाजी राक्षे, सुनीता बोऱ्हाडे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. उमेदवार दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले ” आदिवासी भागातील गावांसाठी वरदान ठरलेली कोंढवळ नळ पाणीपुरवठा काही तांत्रिक कारणांमुळे अडचणीत सापडली आहे.
मात्र, ग्रामस्थांनी याबाबत चिंता करू नये. नजीकच्या काळात ही योजना निश्चित कार्यान्वित होऊन परिसराला पाणी मिळेल,असे सांगून वळसे पाटील पुढे म्हणाले, येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पूर्वकाळात तब्बल सात वेळा या भागातील आदिवासी बांधवांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची तुम्ही मला संधी दिली. मीदेखील आदिवासी जनतेचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडून सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अनेक योजना मंजूर करून आणल्या. त्याचा आदिवासी जनतेला आज फायदा होताना दिसत आहे.
पूर्वी या परिसरात आल्यानंतर मुख्य रस्त्यापासून कोंढवळ येथे येण्यासाठी रस्ता नव्हता. मोठी गैरसोय होती. आपण रस्त्याचे काम प्राधान्याने करून घेतले. परंतू आता आदिवासी गावांसाठी वरदान ठरलेली कोंढवळ नळ पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक कारणांमुळे रखडलेली आहे. ती सुरू होणे गरजेचे आहे. नजीकच्या काळात ही योजना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. प्रास्ताविक सविता दाते यांनी केले. यावेळी मारुती लोहकरे, पांडुरंग काटे, नितीन लोहकरे यांची मनोगते झाली. पांडुरंग कवठे यांनी सूत्रसंचालन केले.