आंबेगाव : टोमॅटो उत्पादकांच्या हाती ‘भोपळा’

बाजारभाव गडगडले : रोपांमध्ये सुद्धा फसवणूक झाली असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

-अंकुश भूमकर

लोणी धामणी : प्रचंड मेहनत घेऊन ही भांडवल खर्चाच्या पाचटक्के सुद्धा रक्कम हातात पडली नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. सद्यस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून चांगल्या प्रतीचा माल उत्पादित करून सुद्धा शेवटी हाती “भोपळा’ आल्याचे चित्र दिसून येत आहे.

आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी धामणीसह सात गावांत डिसेंबरनंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. याच परिसरातून डिंभे धरणाचा उजवा कालवा दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून जात असूनसुद्धा या गावांना त्याचा कुठलाच फायदा होत नाही. त्यामुळे या परिसरातील बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

कमी क्षेत्र असल्याने येथील शेतकरी जनावरांचा चाऱ्यासह इतर तरकारी पिकांना प्राधान्य देत आहे. या भागांत टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकासाठी भांडवल खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ठराविक शेतकरीच ही पिके घेतात. ह्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडल्यामुळे तसेच वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे थोड्याफार प्रमाणात फटका बसला असला तरीसुद्धा सर्वच पिकांचे उत्पादन चांगले मिळाले आहे; मात्र मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर आवक वाढली परिणामी बाजारभाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे .

टोमॅटो पिकाची लागवड करताना अलंकार जातीच्या रोपांची लागवड केली असून रोपांतही फसवणूक झाली आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना टोमॅटो प्लॉट पाहणीसाठी वारंवार विनंती करूनही कुणीच फिरकले नाही. त्यामुळे टोमॅटो रोपात फसवणूक करणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. या संदर्भात सर्व शेतकरी मिळून कृषी विभागाला निवेदन दिले आहे.
-निलेश करंजखेले, टोमॅटो उत्पादक शेतकरी, धामणी

धामणी (ता. आंबेगाव) येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी रूपेश बाळासाहेब विधाटे यांनी आपल्या एक एकर शेतात मल्चिंगचा वापर व ठिबकद्वारे चार हजार रोपांची लागवड केली. मल्चिंग, ठिबक, खते औषधे, मजुरी असा एकूण 70 हजार रुपये लागवड ते तोंडणीपर्यंतचा खर्च झाला. पहिल्या तोडणीला (हाताळणी) सात क्रेट माल निघाला त्यास प्रती क्रेट 40 रुपये प्रमाणे बाजारभाव मिळाला.

दुसऱ्या तोडणीला पंचवीस क्रेट माल निघाला; मात्र टोमॅटोवर तिरंगा, गुलाबी रंग आल्याने व्यापाऱ्यांनी माल घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सर्व टोमॅटोचे क्रेट अक्षरशः रस्त्यावर फेकावे लागले. हीच परिस्थिती तालुक्‍यातील अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी बहरात आलेल्या बागेत जनांवरे सोडली आहेत. तर काहींनी उभ्या शेतात नांगर फिरवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.