पेठ(प्रतिनिधी) : सातगाव पठार भागातील कुरवंडी (तालुका आंबेगाव) येथील दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .कुरवंडी गाव सात दिवसासाठी सील करण्यात आले असून प्रशासन येथील घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.
मुंबई येथून एक आजारी वृद्ध नातेवाईकांसह कुरवंडी गावात आला होता. त्याला उपचारासाठी मंचर येथे आणण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला होता. सदर वृद्धाचा अंत्यविधी कुरवंडी गावात पार पडला. दशक्रिया आदल्या दिवशी वृद्धाचा मुलगा कोरोना पॉझिटिव आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता .त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कुरवंडी गावात धाव घेतली.
ग्रामस्थांना समजावून गाव सील करण्यात आले. या वृद्धाला मुंबई वरून घेऊन येणारे त्याचे दोन नातेवाईक यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांना पुणे येथे पाठविण्यात आले होते. या दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कुरवंडी गावात सात दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावातून बाहेर येजा करणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. वृद्धाच्या दशक्रियाला नातेवाईक आले होते .तसेच दशक्रियाला हजर असलेल्या लोकांची नावे प्रशासनाने शोधण्यास सुरुवात केली होती .मात्र आता संशयितांचे रिपोर्ट निगेटिव आल्याने प्रशासनाला हायसे वाटले आहे .असे असले तरी कुरवंडी गावच्या परिस्थितीवर प्रशासन अजून बारीक लक्ष ठेवणार आहे.