पुणे(प्रतिनिधी) – आंबेगाव बुद्रुक येथे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहने आडवून दगडे मारणाऱ्याला सत्र न्यायाधीश ए.व्ही. रोट्टे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. विनायक महादेव खोत असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. भालचंद्र पवार, ॲड. चंद्रशेखर भुजबळ आणि ॲड. अक्षय रतनगिरी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
ही घटना 12 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास नऱ्हे आंबेगाव बुद्रुक रस्त्यावर घडली. त्यापैकी काही दगड दुचाकीस्वरांना लागले. त्यामुळे खाली पडून जखमी झाले. तर तीन चारचाकी गाड्यांच्या काचा तुटल्या होता. त्यामुळे लोक घाबरून सैरावैरा पळत सुटले. याबाबत हॉटेल व्याव्सायिकांने फिर्याद दिली आहे.
हॉटेलकडे चालत निघालेल्या त्या व्यावसायिक आणि मित्राच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. त्या व्यक्तीचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्याला या गुन्ह्यात अडकाविण्यात आले आहे. तो स्वत: जखमी झाला आहे. त्याचा रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे.
त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मंजुर करण्याची मागणी ॲड. भालचंद्र पवार यांनी केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, पोलिसांना तपासास सहकार्य करणे, या आणि अशा विविध अटींवर हा निकाल दिला आहे.