तळेगावात आंबेडकरप्रेमी संघटना आक्रमक

विविध मागण्यांसाठी तळेगाव नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा

तळेगाव दाभाडे  – आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि इतर आंबेडकरी चळवळीतील संघटनाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयावर गुरुवारी (दि. 19) मोर्चा काढण्यात आला.

तळेगाव स्टेशन येथील विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानापासून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चात स्मारक समितीच्या अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा ऍड. रंजना भोसले, सचिव किसन थुल, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, तुकाराम मोरे, नाना भालेराव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, इम्रान शेख, माऊली सोनवणे, बाळकृष्ण टपाले, मधुकर भालेराव, किसन ओव्हाळ, किरण साळवे, कोंडीबा रोकडे, अमर चौरे, सचिन कांबळे, संगीता कदम, समीर उबाळे, आरती पंडागळे, अण्णा चौरे, आर. डी. जाधव, रमेश ओव्हाळ, बाळासाहेब गायकवाड, कोंडीबा रोकडे, संजय गायकवाड, भागवत बिऱ्हाडे, संजय साखळे, आंनद वंजारी, संतोष मेश्राम, दिनेश गवई यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

मागण्यांचे निवेदन उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांचे येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा, स्मारकाच्या आरक्षित झालेल्या बंगल्याच्या बाजूला असणारे रिकामे प्लॉट्‌स त्वरीत संपादित करुन त्याचा समावेश स्मारकासाठी नियोजित संकल्पात करण्यात यावा.

जोपर्यंत हे प्लॉट संपादित होत नाही, तोपर्यंत त्याचे विकसनासाठी कोणासही परवानगी देऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानाचे दुरुस्तीसाठी व डागडुजीसाठी आलेला शासनाचा निधी त्वरित वापरण्यात यावा व त्याबाबत आपण विशेष सभा घेऊन त्याबाबत योग्य तो ठराव पारित करण्यात यावेत. मागण्यांकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड. भोसले यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.