आंबेडकर प्रेमी, मुस्लिम आणि लिंगायत व्होट बॅंक सुशीलकुमार शिंदेंपासून दुरावली

आता मराठा समाजावरच सुशीलकुमारांची एकमेव मदार !

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक सर्वच उमेदवारांना आता अवघड वाटू लागली आहे. प्रथम कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात विजेतेपदासाठी रस्सीखेच होईल असे वाटत होते. परंतु वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या एन्ट्रीने मात्र निवडणुकीत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आंबेडकरांमुळे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे मात्र आपल्या वर्षानुवर्षे सोबत असणाऱ्या आंबेडकर प्रेमी, मुस्लिम आणि लिंगायत व्होटबॅंकेपासून वंचित राहतात कि काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंबेडकरांमुळे दलित समाज एकवटला आहे. शिवाय मुस्लिम समाजसुद्धा काही अंशी शिंदे यांच्यापासून दुरावला आहे. तर महास्वामींच्या उमेदवारीमुळे शिंदेंचा हक्काचा लिंगायत समाज दुरावल्यामुळे आता सुशीलकुमारांची मदार आता मराठा समाजावर असल्याचे दिसून येत आहे. सुशीलकुमारांसाठी कधी नव्हे तो मराठा समाजाचे नेते कामाला लागले आहेत.

प्रकाश आंबेडकरांमुळे सोलापूर लोकसभेची निवडणूक जातीय समीकरणांवर येऊन ठेपली आहे. सोलापुरात मराठा, लिगायत, मुस्लिम, दलित,पद्मशाली, मोची आदी समाजबांधव आहेत. ज्यामध्ये मराठा, मुस्लिम, पद्मशाली आणि लिंगायत तसेच दलित समाजाची मते निर्णायक आहेत. आतापर्यंत सोलापूर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लिंगायत,मुस्लिम, काही अंशी मराठा तसेच दलित आणि अन्य छोटे मोठे समाज शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले.
मागच्या निवडणुकीत मोदी लाटेत शिंदे यांचा पराभव झाला . मात्र यंदा आंबेडकरांमुळे शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत, हे नाकारून चालणार नाही.

आंबेडकरांच्या उमेदवारीनंतर शिंदे यांचे दलित समाजातील बडे नेते आणि कार्यकर्ते आता 100 टक्के आंबेडकरांसोबत असल्याने आणि त्यांच्यासोबत एमआयएम असल्याने मुस्लिम समाजसुद्धा काही प्रमाणात शिंदे यांना दुरूनच नमस्कार करत आहे. महास्वामी उभे राहिल्याने लिंगायत नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली.

सकल मराठा समाजाने जरी शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला नसला तरीसुद्धा सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यात याच मंडळींचा महत्वाचा वाटा होता. आणि तीच मंडळी आता शिंदे यांच्यासाठी जात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांच्यासाठी सोलापुरात नेमके वातावरण कसे आहे याची माहिती घेतली. आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात असे चित्र दिसून आल्यानंतर पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा सल्ला दिल्याचे समजते.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय व्यवस्थित न हाताळल्याने मराठा समाज फडणवीस सरकारवर नाराज आहे. त्यातच प्रत्यक्ष कोणालासुद्धा पाठिंबा न देता थेट मराठा समाजाच्या नेत्यांवर शिंदे यांच्या विजयाची जबाबदारी येऊन पडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.