पुणे – करोना लसीची माहिती घेण्यासाठी 100 देशांतील राजदूत पुण्यातील सिरम इन्सिट्युट व हिंजवडी येथील जीनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स या कंपन्यांना दि. 4 डिसेंबरला भेट देणार होते. मात्र, राजदूतांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. पुन्हा सुधारित दौरा निश्चित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला याची माहिती कळविण्यात येणार आहे.
हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये करोनावरील लस तयार करण्यात येत आहे. या लसीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे 100 देशांचे राजदूत यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची इच्छा परराष्ट्र मंत्रालयाकडे व्यक्त केली होती. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने याआधी दि.28 नोव्हेंबर ही तारीख या भेटीसाठी निश्चित केली होती.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.28 नोव्हेंबरला सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याने या दिवसाचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर दि.4 डिसेंबरला सिरम इन्स्टिट्यूट भेटीची तारीख निश्चित करण्यात आली. आता, मात्र दि. 4 डिसेंबरचा राजदूतांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.