गांधीनगर – गुजरातमधील अंबाजी शक्तिपीठ मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, छोटे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिराच्या प्रतिष्ठेला शोभणारेच कपडे परिधान केले पाहिजेत, असे ट्रस्टचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरात मधील श्यामलाजी मंदिर ट्रस्टनेही असा निर्णय घेतला होता.
गुजरातमधील अंबाजी शक्तिपीठ हे तिर्थक्षेत्र आहे. असे सांगितले जाते की, देवी अंबेचे हृदय येथे पडले होते. या मंदिराचे पौराणिक महत्व पाहता येथे मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर मंदिर परिसरात बोर्ड लावण्यात आले आहेत.
मंदिरात छोटे कपडे परिधान करून प्रवेश करण्यास मनाई आहे. मंदिराच्या प्रतिष्ठेला शोभतील असेच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करावा, असे मंदिरातील बोर्डवर लिहिण्यात आले आहे. हा निर्णय खुप जुना आहे, मात्र योग्य कपडे परिधान करून भाविक मंदिरात येतील यासाठी हे बोर्ड लावण्यात आले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देखील स्वागत केले आहे. अंबाजी मंदिरात देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येत असतात. भाविकांनी मंदिराची प्रतिष्ठी राखली पाहिजे असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.