Ambadas Danve : निवडणुकीच्या अपयशानंतर ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार? अंबादास दानवेंचं सूचक विधान !

Uddhav Thackeray | Ambadas Danve – मुख्यमंत्री पदावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. तीनही महत्वाचे पक्ष मिळून त्यांना ५० जागांवर विजय देखील मिळविता आला नाही. पराभूत उमेदवारांची मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली, यावेळी बहुतांश जणांनी स्वबळावर पुढे जाण्याचा सूर आळवला.
त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, यावर चर्चाना सुरुवात झाली आहे. या चर्चाना विधान परिषदेतील उपनेते असलेल्या अंबादास दानवे यांनी देखील दुजोरा दिला आहे.
दानवे म्हणाले, पक्षात अनेकांचा स्वबळावर लढावे असे म्हणणे आहे, जे आम्ही आजिबात नाकारत नाही. शिवसेनेने स्वतंत्रपणे लढायला हवे, असे बऱ्याच जणांना वाटते. शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आली नाही.
आज ना उद्या सत्ता मिळेलच, मात्र शिवसेना ही एका विचाराने काम करणारी संघटना आहे. त्यामुळे सगळ्याच निवडणुकांमध्ये स्वतंत्र संघटनांची निर्मिती करून निवडणूक लढली पाहिजे, असे दानवेंनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मविआला केवळ ४६ जागा मिळाल्या. शिवसेनेने (उबाठा) २०, काँग्रेसने १६, राष्ट्रवादीने (शप) १० जागा जिंकल्या. मविआतील कुणालाच विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढ्या जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान २९ सदस्य असावे लागतात. त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत.
वडेट्टीवार याची सावध प्रतिक्रिया
‘जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे, तशी आमचीही इच्छा होती. मात्र, हा काही इच्छेचा विषय नाही. आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
आमची भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्हीही मांडू. मात्र, आम्ही इतक्या घाईने कोणतीही भूमिका मांडणार नाही. वरिष्ठांशी चर्चा करून भूमिका ठरवली जाईल, अशी सावध प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.





