ऍमेझॉन भारतात काही उपकरणांची निर्मिती करणार

नवी दिल्ली – ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ऍमेझॉन भारतात काही उपकरणांची निर्मिती करणार असल्याचे या कंपनीकडून जाहीर करण्यात आले. त्यामध्ये फायर टीव्ही स्टिकचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या वर्षाच्या अखेरीस चेन्नई येथील कारखान्यातून फॉक्‍सकॉनच्या माध्यमातून या उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला कंपनीचा पाठिंबा असून त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये गुंतवणूक आणि उत्पादन करण्याचा कंपनीचा इरादा असल्याचे अमेझॉनने ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटले आहे.

मात्र चेन्नईतील प्रकल्पात किती गुंतवणूक करण्यात येणार आहे, त्याचबरोबर चेन्नई येथील उत्पादन क्षमता काय असेल, या उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे का याबाबत कंपनीने कसलेही स्पष्टीकरण केलेले नाही. या संदर्भात कंपनीचे उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना माहिती दिली आहे.

भारत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून एक आकर्षक केंद्र आहे. या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याबाबत कंपनी आशावादी असल्याचे सांगण्यात आले. भारतात तयार झालेल्या वस्तू अमेझॉनच्या व्यासपीठावरून इतरत्र विकण्याच्या शक्‍यतेवर या कंपनीने विचार करावा असे प्रसाद यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

याबाबत कंपनीने सकारात्मक विचार करीत असल्याचे सांगण्यात आले. भारतातील छोट्या उद्योगांना मदत करण्याचा कंपनीचा विचार असून भारतामध्ये छोट्या कंपन्यांना मदत करण्यासाठी ऍमेझॉन कंपनी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.