वॉशिंग्टन: अमेरिकेतील आर्थिक व्यवहार पुन्हा त्वरित सुरू करण्यास सरकारने चालना दिल्याने आज पासून ऍमेझॉन या जगातल्या सर्वात मोठ्या इ कॉमर्स कंपनीने आपले कामकाज सुरू केले आहे. पण तेथे कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेचे कोणतेच प्रभावी उपाय नसल्याने तेथील बहुतांशी कर्मचाऱ्यांनी उद्यापासूनच संपावर जाण्याचा इशारा दिल्याने ऍमेझॉन कंपनी पुन्हा अडचणीत आली आहे.
कामगारांच्या संघटनेच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की सध्या निर्माण झालेल्या करोना आव्हानाच्या संबंधात कंपनीने कोणतेच सुरक्षा उपाय योजलेले नाहींत. अशा स्थितीत तेथे धोकादायक पद्धतीने काम करणे कामगारांना शक्य होणार नाही. या कंपनीने करोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून या अनुषंगाने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
या असुरक्षित वातावरणाविषयी कर्मचारी गेल्या चार आठवड्यांपासून व्यवस्थापनाकडे तक्रारी करीत आहेत. पण अशा तक्रारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामावरून कमी करण्याचा प्रयत्न या कंपनीने चालवला आहे अशी संघटनावाल्यांची तक्रार आहे. दरम्यान कंपनीकडे येणाऱ्या ग्राहकांच्या प्रचंड मागण्या लक्षात घेऊन आम्ही लवकरच पावणे दोन लाख नवीन कर्मचारी भरती करणार आहोत असे कंपनीने म्हटले आहे.