आश्‍चर्यम… बारणेंचा सव्वा लाख खर्च

मावळ लोकसभा ः पार्थ पवारांनी खर्चले केवळ सात लाख

“वंचित’-बसपाचा खर्च हजारोंमध्ये

मावळ लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही विविध प्रचारसभा, रॅलीने मतदारांचे लक्ष वेधत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी आत्तापर्यंत 54 हजार 684 रुपये प्रचारावर खर्च केले आहेत. तर, बहुजन समाज पार्टीचे ऍड. संजय कानडे यांनीही 32 हजार 223 रुपयांचा खर्च केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील 4 उमेदवार वगळता इतर 17 उमेदवारांनी आपला खर्च सादर केला आहे. त्यापैकी बहुतांश उमेदवारांनी सभा, मेळावे, रॅलीला झालेला खर्च सादर केला. तसेच प्रचारासाठी काढण्यात आलेली पत्रके,वाहनांना लागलेले इंधन, झेंड्यासाठी खर्च झालेले पैसे यावर खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.

पिंपरी – दोन जिल्हे, सहा विधानसभा अशा खूप मोठ्या परिसरात विस्तारलेल्या आणि 22 लाखांहून अधिक मतदार असणाऱ्या मावळ मतदार संघातील सेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पहिल्या दोन टप्प्यात केवळ सव्वा लाख रुपये तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्थ पवारांनी सव्वा सात लाख रुपये प्रचारासाठी खर्च केल्याचा हिशोब निवडणूक आयोगास सादर केला आहे.

या प्रकारामुळे उमेदवार किती खरा हिशोब सादर करतात, हीच बाब उजेडात आली आहे. शेवटच्या टप्प्यात मोठे खर्च करता यावेत, यासाठी पहिल्या दोन टप्प्यात उमेदवारांनी हात आखडता घेतला असल्याचे सांगितले जात आहे. अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या लढतीमुळे मावळ लोकसभेच्या आखाड्यात सर्वच उमेदवार जपून पावले टाकत आहेत. दोन टप्प्यात केवळ सव्वा सात लाख रुपये खर्च करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार ठरले आहेत.

पार्थ पवार यांनी आत्तापर्यंत प्रचारावर 7 लाख 20 हजार 760 रुपये खर्च केले आहेत. त्यापाठोपाठ भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 1लाख 24 हजार 755 रुपये खर्च केला आहे. उमेदवारांनी पहिल्या दोन टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी खर्च केलेला आहे. आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील दिग्गजांच्या सभा, आणि रॅलीचे आयोजन केल्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यासाठी आपले पैसे राखून ठेवल्याचे बोलले जात आहे. प्रचार करण्यासाठी मुख्य उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च खूपच नगण्य भासत आहे. एवढ्या मोठ्या परिसरात फिरत असलेली प्रचार वाहने, प्रत्येक परिसरात प्रचार करत असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते, रॅली, हा सर्व खर्च उमेदवारांनी अगदी थोडक्‍यात भागवून मोठी काटकसर केल्याचे त्यांच्या हिशोबाचे आकडे भासवत आहे. तरीही सर्वसामान्य मतदारांनाही गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेला प्रचार सव्वा लाखात झाला असल्याचे पचनी पडणे अवघड आहे.

उमेदवारांना प्रचारासाठी 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. मावळातील उमेदवारांनी पहिल्या दोन टप्य्यातील खर्चाची माहिती सादर केली आहे. पार्थ पवार यांनी पहिल्या टप्यात 4 लाख 23 हजार 853 रुपये खर्च केले होते. तर दुसऱ्या टप्प्यात त्यांनी खर्चाबाबतीत आखाडता हात घेतला असल्याचे दिसून येते. पवारांनी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख 96 हजार 907 रुपये खर्च केला आहे. आत्तापर्यंत पवार यांचा खर्च 7 लाख 20 हजार 760 रुपये झाला आहे.

तर शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पहिल्या टप्प्यात 1 लाख 18 हजार 994 रुपये खर्च केले होते. तर दुसऱ्या टप्प्यात केवळ 5 हजार 761 रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे, पार्थ पवारांच्या तुलनेत सध्या तरी श्रीरंग बारणे हे खर्चाच्या बाबातीत आखाडता हात ठेवून खर्च करीत असल्याचे दिसत आहे. आता शेवटच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांकडून दिग्गजांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे, प्रचारावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील खर्च उमेदवारांनी सादर केल्यानंतरच उमेदवारांनी एकूण किती खर्च केला हे स्पष्ट होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.