शेवगाव (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी कोव्हिड 19 मुळे श्रीक्षेत्र अमरापुरचे श्री रेणुका माता देवस्थान बंद होते. राज्य सरकारने घटस्थापनेच्या (दि .7 ) मुहुर्तावर राज्यातील देवस्थाने दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे या वर्षीच्या घटस्थापनेला विशेष महत्व आले. देवस्थाने खुली झाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला असून श्री रेणुका माता देवस्थानचे भाविक मोठ्या उत्साहात माहूरहून ज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहेत.
साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथून अमरापूरच्या श्री रेणुका मातेच्या स्थानघटस्थापनेसाठी दरवर्षी पायी ज्योत आणली जाई. मात्र करोना मुळे गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही ही ज्योत सजविलेल्या वाहनातून आणण्यात येणार आहे.
मंगळवारी सकाळी साडेअकराची आरती करून तसेच देवस्थानचे प्रणेते स्व .चंद्रकांत दादा भालेराव यांच्या समाधीस व दरवर्षी साडे चारशे किलोमीटर पायी ज्योत आणणाऱ्या 35 भाविकांच्या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या स्व . योगेश भालेराव यांच्या स्मृतीस अभिवादन करून रेणुका परिवारातील पांडुरंग देवकर, अश्वलिंग जगनाडे, गणेश गाडे, श्रीमंत घुले हे भाविक माहूर गडा कडे रवाना झाले .
देवस्थानाचे पुजारी तुषार देवा यांनी ज्योतीची विधिवत पुजा करून मार्गस्थ केले. हजारो वृक्ष राईने नटलेल्या येथील श्री रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त श्री रेणुका माता मंदिरासह परिसरातील सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रेणुका परिवारात उत्साह संचारला आहे.
गुरुवारी ( दि. ७) देवस्थानात सकाळी रेणुका आई साहेबांना लघुरुद्राभिषेक घातला जाऊन घटस्थापना करण्यात येईल . त्यानंतर सप्तशती पाठ,11.30 ला महाआरती, संध्याकाळी 6.30 ला आरती असा रोजचा नियमित कार्यक्रम रहणार आहे. रोजच्या पुजेसाठी रेणुका भक्त प्रशांत नाना भालेराव बसणार आहेत .
मास्क असणाऱ्या भाविकांनाच टप्या टप्याने प्रवेश…
करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सुरक्षित अंतराचे काटेकोर पणे पालन करण्यात येणार असून हातपाय धुण्याची , सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे . मास्क असणाऱ्या भाविकांनाच मंदिरात टप्या टप्याने आई साहेबांच्या दर्शना साठी प्रवेश दिला जाणार आहे . या साठी मंदिर परिसरात बारा सिक्युरीटी गार्ड तैनात करण्यात आले आहेत. नेहमी प्रमाणे विविध प्रकारची लागणारी व्यावसायिक, मनोरंजनाची दुकाने लागणार नाहीत. तसेच यंदा येथे घटी बसता येणार नसून नेहमी प्रमाणे होणारी रोजच्या फराळाची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार नाही . याशिवाय देवस्थानात कथा, प्रवचनासारखे कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देवस्थानाचे विश्वस्त विधिज्ञ नितीन भालेराव, रेणुका भक्तानुरागी मंगलताई भालेराव यांनी दिली .