पुणे: अनेक जुने मित्र- मैत्रिणी, भरभरून गप्पाटप्पा, कॉलेजच्या दिवसाच्या रम्य आठवणी आणि भरून आलेलं हृदय असा गोड अनुभव रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी रानडे इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज पार पडला. ‘रानडे इन्स्टिट्यूट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या विभागाचे अनेक आजी-माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
माजी विभागप्रमुख प्रभाकर परांजपे, किरण ठाकूर तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विभागप्रमुख डॉ. उज्वला बर्वे, विभागाचा अध्यापक वर्ग आणि आजी विद्यार्थ्यांनी जमलेल्या सर्वांच्या कॉलेज जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. पन्नास आणि पंचवीस वर्षांपूर्वीच्या विभागाच्या विद्यार्थ्यांचे सत्कारही करण्यात आले.
उपस्थितांनी आपले अनुभव एकमेकांशी शेअर करत जुन्या आठवणी जागवल्या. विभागात स्लाइड शो द्वारे जुने फोटोज सुद्धा दाखवण्यात आले. माजी विद्यार्थ्यांची पुस्तके, त्यांनी केलेले काम याचं छोटेखानी प्रदर्शनही यानिमित्ताने विभागात भरवण्यात आले होते. आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना नव्याने भेटून, पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचा निर्धार करून या सोहळ्याची सांगता झाली.
– वैष्णवी सविता सुनील,
कॉलेज रिपोर्टर,
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.