– अरुण गोखले
माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात, घटना घडतात, विचित्र वेळ येते की त्यावेळी तो हतबल होतो. निराधार आणि निराश होतो. त्याला आपण एकटे आहोत असे जाणवते. अशा खचलेल्या, उन्मळून पडलेल्या निराशेने काळवंडलेल्या अवस्थेत त्याला जर चार आधाराचे, आश्वासनाचे, कोणीतरी आपले आहे ह्या दिलाशाचे शब्द ऐकायला मिळाले.
त्याच्या गालावरची ओघळणारी आसवे पुसून, त्याच्या पाठीवरून मायेचा हात ङ्गिरवीत जर त्याला कोणी ‘बाबा रे, काय झाले? तू असा हताश, निराश का झाला आहेस? तू असा का खचून गेला आहेस? हे बघ, असा धीर सोडू नकोस, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी.’
त्या ‘मी आहे ना’ या आश्वासक शब्दांनीच त्याला पुनश्च उभे राहण्याचे बळ येते. त्याचा जाणारा तोल, संयम सावरला जातो. खचणारा आत्मविश्वास, संपू पाहणारी जीवन जगण्याची आशा पुन्हा एकवार जीव धरते. कारण, त्याला मिळालेलं असतं ते कोणीतरी माझं आहे, माझ्या मागे आहे. मला सांभाळणार आहे, हा विश्वास, हा दिलासा, हे अंतरिक बळ.
या अंतरिक बळाच्या सामर्थ्यावरच तो कोसळता कोसळता उभा राहतो. त्याला नैराश्याच्या काळोखातून आशेचा प्रकाश किरण खुणावू लागतो. तो उठून पुन्हा उभा राहतो, प्रयत्नांची प्रामाणिक धडपड करू लागतो. कोणी तरी माझं आहे, या विश्वासाची, आश्वासक शब्दांची एक छोटीशी ज्योत त्याला नैराश्याच्या काळोखातून पुन्हा आशेच्या उजेडात आणते.
काय असतं त्या शब्दात? त्यात असतं विश्वासाचं बळ. त्यात असते संघर्षाची शक्ती. त्यात असते निराशेवर आशेने मात करण्याची कला. ‘बाळा! भिऊ नकोस मी आहे ना’, या मातेच्या आश्वासक शब्दांवर विश्वास ठेवूनच लहान मूल अंधार्या खोलीतही मोठ्या धिटाईने जाते. डॉक्टरांच्या ‘तू बरा होणार आहेस’, ह्या एकाच आश्वासनाने रोग्यास मानसिक शक्ती प्राप्त होते. संसारतापाने पोळलेला जीवसुद्धा साधू-संत, सद्गुरूंच्या ह्याच आश्वासक दिव्य शब्दामृत धारांनी निवतो.
आपोआपच चिंता न करता खर्या अर्थाने माझा कोण ह्याचे चिंतन करू लागतो. तो माझा खरा पाठीराखा कोण? ह्याचा विचार, ह्याचा शोध आणि तो मिळवण्याचा प्रयत्न इथेच त्या जीवाची परमार्थाची वाटचाल चालू होते.