पूर नसतानाही नदीकाठच्या उद्यानाचे बांधकाम खचले

पिंपरी – यंदा पवना नदीला कोणताही पूर आलेला नाही. तरीही चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्राचे उद्यानाचे कठडे खचून पाण्यात पडले. यामुळे मात्र कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे.

मोरया गोसावी मंदिर परिसर विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन 11 जुलै 2014 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर या जिजाऊ पर्यटन केंद्राचे उद्‌घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे तात्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते 3 जानेवारी 2017 रोजी झाले. या पर्यटन केंद्रासाठी 11 कोटी 46 लाख 80 हजार 728 रुपयांचा खर्च झाला. मे. एच. सी. कटारिया या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. या उद्यानात असलेल्या प्राणी आणि पक्षांच्या प्रतिकृती, ओपन जिम आणि जॉगिंग ट्रॅकमुळे नागरिकांची मोठी गर्दी होते.

या जिजाऊ पर्यटन केंद्राचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून उद्‌घाटनानंतर काही दिवसातच येथील फरशा निखळल्या होत्या. तसेच ओपन जिमचे साहित्यही वारंवार तुटत असते. यंदाच्या वर्षी पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला नाही. यामुळे पवना नदीला दरवर्षी येतो तसा पूरही आलेला नाही. असे असतानाही नदीकिनारी असलेला जॉगिंग ट्रॅक खचला आहे. सुदैवाने यामध्ये कोणलाही इजा झालेली नाही.

ठेकेदार पोसण्याची वृत्ती
जिजाऊ पर्यटन केंद्रातील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, ठेकेदार पोसण्याच्या वृत्तीमुळे आपल्या तक्रारीची महापालिकेने दखल घेतली नसल्याचा आरोप चिंचवडे यांनी केला आहे. आता तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्‍तांना केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.