पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून इतर कल्याणकारी योजनेमार्फत दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस दिले जाते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटलेली दिसून येत आहे.
परंतु बक्षीसाची रक्कम मात्र वाढलेली दिसून येत आहे. यावर्षी शहरातील 4754 गुणवंत विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यासाठी महापालिकेला साधारण 6 कोटी 13 लाख 50 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे.
सन 2019-20 मध्ये दहावी, बारावीचे एकूण 4941 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यासाठी 6 कोटी 3 लाख 65 हजार रुपये एवढा खर्च आला. तर सन 2020-21 मध्ये दहावी, बारावीचे एकूण 4934 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यासाठी 6 कोटी एवढा खर्च आला. मात्र सन 2021-22 मध्ये नागरवस्ती विभागाकडून खासगी शाळांमधील दहावी, बारावीमध्ये 80 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या बक्षीस योजनेचा लाभ घेता येतो.
शहरातून नागरवस्ती विभागाला दहावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले 2161 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1992 अर्ज पात्र तर 169 अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्याला 10 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
त्यासाठी साधारण 1 कोटी 99 लाख 20 हजार रुपये खर्च येणार आहे. तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे 1187 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील 1119 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर 68 अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 15 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला 1 कोटी 67 लाख 85 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.
बक्षीस योजनेसाठी 4754 विद्यार्थी ठरले पात्र
शहरातील बारावीत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या 1892 विद्यार्थ्यांनी अर्ज केला. त्यापैकी 1643 विद्यार्थी पात्र तर 249 विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्याला 15 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला 2 कोटी 46 लाख 45 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.
नागरवस्ती विभागाच्या इतर कल्याणकारी योजनेला शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दहावी, बारावीचे असे एकूण 4754 विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
तर 486 विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. त्यातील अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या त्रुटी लक्षात घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची पुर्तता करून त्यांना या योजनेचे लाभ देण्यात येईल. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर बक्षीसाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
– अजय चारठणकर, उपायुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका.