भारतातील विश्‍वकरंडकासाठी पर्यायी योजना

आयसीसीकडे श्रीलंका व अमिरातीचा प्रस्ताव

दुबई – भारतात पुढील वर्षी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचे आयसीसीने काही दिवसांपूर्वी जाहीर केले. मात्र, भारतातील करोनाची परिस्थिती सुधारली नाही तर आयसीसीसमोर श्रीलंका व अमिराती या देशांत ही स्पर्धा खेळविण्याचा पर्याय आहे, असे आयसीसीने जाहीर केले आहे.

यंदा ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ही स्पर्धा आता 2022 साली होणार असून त्यापूर्वी पुढील वर्षी भारतात देखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टी-20 विश्‍वकरंडक होणार आहे. जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, 2021 विश्‍वचषकासाठी आयसीसीने भारतासह श्रीलंका व अमिराती या दोन देशांचा पर्याय खुला ठेवला आहे.

करोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक आहे. त्यामुळे बीसीसीआयने देखील अमिरातीचा प्रस्ताव स्वीकारून यंदाची आयपीएल तेथे आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याने विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत तरी देशातील परिस्थिती सुधारेल का, असा प्रश्‍न आहे. तसेच स्थानिक स्पर्धांसाठीही बीसीसीआयने यंदा केवळ दोनच स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले होते.

यंदा केवळ रणजी करंडक व सय्यद मुश्‍ताक अली टी-20 या दोनच स्पर्धा होणार आहेत. 2021 सालच्या टी-20 विश्‍वकरंडकासाठी वर्षभराचा कालावधी बाकी असला तरीही करोनाची परिस्थिती सुधारली नाही तर पर्याय म्हणून आयसीसीने श्रीलंका आणि युएई या दोन देशांचा विचार केला आहे.

मात्र, त्याचवेळी बीसीसीआयने 2021 सालची विश्‍वकरंडक स्पर्धा निश्‍चितच देशात आयोजित होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. आता पुढील तीन महिन्यांत करोनाची भारतातील स्थिती कशी असेल याचा आढावा घेतल्यावरच आयसीसी याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.