पाकिस्तानी राजकीय पक्षाचा संस्थापक स्कॉटलंड यार्डच्या रडारवर

लंडन : मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्‍यूएम) या पाकिस्तानमधील राजकीय पक्षाचा संस्थापक अल्ताफ हुसेन स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या रडारवर आला आहे. ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या 65 वर्षीय हुसेनवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हुसेन याने सुमारे 25 वर्षांपूर्वी ब्रिटनकडे आश्रय मागितला. त्यानंतर त्याला ब्रिटीश नागरिकत्व मिळाले. तिथे राहूनही त्याची एमक्‍यूएमवरील पकड मजबूूत आहे. पाकिस्तानच्या बड्या पक्षांमध्ये एमक्‍यूएमचा समावेश होतो. त्या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीवर आहे.

ब्रिटनमध्ये राहून तो पक्ष समर्थकांना संबोधित करत असतो. त्याने ऑगस्ट 2016 मध्ये एक आक्रमक भाषण केले. त्या भाषणात त्याने पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. त्याशिवाय, पाकिस्तानचा उल्लेख त्याने संपूर्ण जगासाठीचा कॅन्सर अशा शब्दांत केला. त्यामुळे पाकिस्तानचे पित्त खवळले.

हुसेनवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने ब्रिटनशी संपर्क साधला. त्यातून त्याच्यामागे स्कॉटलंड यार्डचा ससेमिरा लागला. हुसेनला चालू वर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. हुसेनने अलिकडेच म्हणजे ऑगस्टमध्ये समर्थकांना उद्देशून एक भाषण केले. त्यात त्याने काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून पाकिस्तान सरकार आणि लष्कर 72 वर्षांपासून पाकिस्तानी जनतेची फसवणूक करत असल्याचे म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.