लंडन- इंग्लंडमध्ये निर्वासित असलेले पाकिस्तानी नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे प्रमुख अल्ताफ हुसैन यांनी भारतात आश्रय मागितला आहे. अल्ताफ यांनी भारतात आश्रय देण्याची किंवा आर्थिक मदत प्रदान करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. पाकिस्तानात दहशतवादाचे गुन्हे नोंद असलेले अल्ताफ हे सद्यकाळात लंडनमध्ये वास्तव्यास आहेत.
हुसैन यांनी 2016 मध्ये ब्रिटनमधून पाकिस्तानातील स्वतःच्या पाठिराख्यांसाठी कथित द्वेषमूलक भाषण प्रसारित केल्याचा आरोप आहे. हुसैन यांनी या भाषणात पाठिराख्यांना कायदा हातात घेण्याचे आवाहन केले होते. दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांप्रकरणी 10 ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसेसने त्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले होते.
या प्रकरणी जून 2020 मध्ये खटला सुरू होणार आहे. या गुन्ह्यांमुळे अल्ताफ यांना कुठल्याही प्रवास दस्तऐवजासाठी अर्ज करण्याची अनुमती नाही. हुसैन यांनी भारताकडे आश्रयाची मागणी करून जामीन अटींचे उल्लंघन केले आहे का, याची पडताळणी वकील करत आहेत.
भारतात आजी-आजोबा यांची दफनभूमी असल्याने तेथे जाऊ इच्छितो, असे त्यांनी म्हटले होते. मोदींनी भारतात प्रवेश करण्याची अनुमती दिल्यास आणि आश्रय मिळाल्यास सहकाऱ्यांसह तेथे पोहोचणार असल्याचे हुसैन यांनी म्हटले आहे. लंडन येथूनच हुसैन हे मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेतृत्व सांभाळत आहेत.