दरात घसरण अन्‌ पिकावरही करपा

कांदा उत्पादकांची चिंता वाढली
बेल्हे (वार्ताहर) – सततच्या ढगाळ वातावरणामुळे जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील नगदवाडी, वडगाव कांदळी, कांदळी, साळवाडी, बोरी, जाधववाडी, तांबेवाडी, साकोरी, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव, आणे, नळवणे परिसरात कांदा पिकावर करप्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर “मावा’ कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे फवारणी केली तरी आठ दिवसांत पुन्हा कांद्यावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. माव्याचे कीटक कांदा पातीतील पोषणतत्वे शोषून घेतात त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.

कांद्याला थंडी पोषक असते; परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात थंडी न पडल्याने त्याचा विपरीत परिणाम या पिकावर दिसून येत आहे यावर्षी पोषक हवामान नसल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. चालू वर्षी कांदा पिकास बाजारभाव उचांकी मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केलेली आहे; परंतु खराब हवामानाचा फटका या पिकाला बसल्याने याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

सध्या कांद्याचे बाजार भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला प्रचंड खर्च वसूल होईल की नाही, याबाबत शंका आहे. कांदा पीक हे शेतकऱ्याचे यावर्षी आर्थिक गणित बिघडवणार की फायद्याचे ठरणार, हे सगळे बाजारभावावर ठरणार आहे. आणे पठारभागावर काही ठिकाणी कांदा काढणी सुरू आहे. ढगाळ वातावरण व सतत पडणारे दाट धुके यामुळे कांदा पिकाच्या वाढीवर ही वातावरणाचा परिणाम झाला आहे. कांदा काढणीसाठी मंजूरही मिळत नाहीत.

सततच्या ढगाळ व अनियमित वातावरणामुळे कांद्यावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव माझ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे फवारणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्या प्रमाणात उत्पादन निघेल की नाही, याबाबत सांशकता आहे. एकरी सुमारे 40 ते 50 हजार रुपये खर्च आला असून बाजारभाव गडगडल्याने आर्थिक गणित बिघडण्याची शक्‍यता आहे.
– पोपट बढे, वडगाव कांदळी, कांदा उत्पादक शेतकरी

ढगाळ वातावरण व पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक व कीटकनाशकाची नियमितपणे फवारणी करणे आवश्‍यक आहे.
– नीलकंठ भोर, कृषी सल्लागार, भोरवाडी, वडगाव कांदळी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.