लेण्याद्रीला गिरिजात्मजाच्या दर्शनासह पर्यटनाचाही आनंद 

जुन्नर  – संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी (दि. 20) श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे भाविकांनी गर्दी करत श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्‍वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, प्रभाकर गडदे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी, तसेच भाविक भक्त उपस्थित होते.

श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता व दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने भाविकांकरीता विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्‍ताई भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे भजन झाले. रात्री 9:51 वाजता चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

रिमझिम पावसात निसर्गानुभवाची पर्वणी
दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्टीमुळे दिवसभर भाविकांची आणि पर्यटकांची लेण्याद्री परिसरात गर्दी होती. पाऊस व डोंगरावरील धबधब्यांचा अनेक भाविकांनी व पर्यटकांनी मनसोक्‍त आनंद लुटला. पाऊसामुळे लेण्याद्री व आजुबाजूचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने चांगलाच बहरलेला असल्याने अनेक पर्यटकांची पावले याकडे आकर्षित होत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.