वॉशिंग्टन – भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या मदतीने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही करोनावरील लस या रोगाच्या अल्फा आणि डेल्टा जातीच्या विषाणूवरही प्रभावी आहे, असा दाखला अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने दिला आहे. ही लस डेल्टा आणि अल्फा विषाणूंचाही प्रभावी मुकाबला करून त्यांना निरस्त करू शकते, असेही या संस्थेने म्हटले आहे.
ज्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे त्यांच्या रक्ताची तपासणी करून संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही लस त्वरेने अँटिबॉडी तयार करते आणि त्यातून अल्फा आणि डेल्टा विषाणूंचा नायनाट केला जातो. हे विषाणू अनुक्रमे पहिल्यांदा ब्रिटन आणि भारतात सापडले आहेत.
कोव्हॅक्सिन लसींचे डोस आतापर्यंत भारत आणि अन्य देशांतील एकूण 2.5 कोटी लोकांनी घेतली आहे. ही लस पूर्ण सुरक्षित आणि प्रभावी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या लसीच्या दोन टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष या आधीच प्रकाशित झाले असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अजून जाहीर झालेले नसले तरी या चाचण्यांचा जी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे, त्यानुसार ही लस करोनाच्या कोणत्याही विषाणूवर 78 टक्के प्रभावी आहे. अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये ही लस शंभर टक्के प्रभावी ठरते, असे त्यांनी म्हटले आहे. असिम्टीमॅटिक रुग्णांमध्ये ही लस 70 टक्के प्रमाणात प्रभावी आहे.