पुणे -महापालिकेच्या कचरा डेपो मधून कचरा घेऊन जाऊन त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात असे आणि हे खत शेतकरी घेऊन जात असत. हा कचरा पोहोचवणे आणि प्रक्रिया झाल्यावर तो शेतकऱ्यांमार्फत उचलून नेणे यात प्रक्रिया करणाऱ्याला वाहतुकीची कोणतीच तोषिश पडत नसे. त्यामुळे कचऱ्यातून सोने निर्माण करणे काय असते, हे कचरा गोळा करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना चांगलेच समजले आणि ते अब्जपती झाले. मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही, याचे कारण म्हणजे प्लॅस्टिक !
पूर्वी कचऱ्यामध्ये मोठ्याप्रमाणात कागद, अन्नपदार्थ अशा गोष्टी असायच्या, परंतु हल्ली कचऱ्यात प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर दिसत आहे. अन्नपदार्थ फेकून देतानाही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून टाकून दिला जातो. त्यामुळे कचरा उचलणे जरी सोपे गेले असले तरी त्याची विल्हेवाट लावणे हे अतिशय अवघड होऊन बसले. या कचऱ्यातून प्लॅस्टिकचे विलगीकरण करणेच या व्यावसायिकांना परवडेना त्यामुळे त्यांनी खतनिर्मितीसाठी कचरा उचलणे बंद केले. परिणामी महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्प अधिक क्षमतेने सुरू करावा लागला. तोही व्यवस्थित सुरू नसल्याची ओरड आहेच, शिवाय त्यांनाही या प्लॅस्टिकचा तितकाच त्रास होतो, हे नक्की.