आधीच खड्ड्यांचे साम्राज्य… वरून “जीओ’साठी खोदकाम…

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील रस्ते पावसामुळे खराब आणि खड्डेयुक्‍त झालेले असताना शहरात “जीओ’साठी खोदकाम जोमाने सुरू आहे. वैतागलेले नागरिक या खोदकामामुळे त्रस्त झाले आहेत. मात्र पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

शहरात यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या पावसाने सुमारे महिनाभर मुक्काम ठोकल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय झाली. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करून पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरण्याचेच काम केले. शहरातील खड्डे बुजविण्याचे पालिका प्रशासनाकडून बिनदिक्कतपणे सांगितले जात आहे. मात्र गेल्या महिनाभरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुप्पटीने वाढ झाली आहे. या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत पालिका प्रशासनाने शहरतील रस्ते खोदण्याची “जीओ’ मोबाईलला परवानगी दिली आहे. या कंपनीच्या ठेकेदारांनी शहरातील अनेक रस्त्यांवर खोदाई करत शहरवासियांच्या अडचणीत भरच टाकली आहे.

ज्या ठिकाणी खड्डे खोदून केबल टाकली गेली, त्या ठिकाणच्या चारी व्यवस्थित बुजविण्याची तसदीदेखील घेण्यात आलेली नाही. उखडलेले रस्ते आहे तसे ठेवण्यात आल्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नागरिकांना वेठीस धरून ठेकेदारांची तळी उचलणारे आणि “जीओ’च्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे शहरवासियांच्या अडचणींकडे लक्ष देणार तरी कधी? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.

खोटी माहिती देण्याचा प्रयत्न
सध्या शहरात “जीओ’च्या केबलसाठी रस्ते खोदले जात आहेत. मात्र याबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आणि खोटी माहिती दिली जात आहे. काही ठिकाणी ड्रेनेजसाठी तर काही ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. हा खोटारडेपणा कोण करतेय हे देखील उजेडात आणण्याची गरज नागरिक व्यक्‍त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.