आधीच करोनाने हैराण, आता बर्ड फ्लूच्या धास्तीने चिकनचे दर घसरले

पिंपरी – आधीच करोनाने हैराण झालेल्या नागरिकांना आता बर्ड फ्लूची धास्ती सतावत आहे. या नव्या आजाराने पोल्ट्री व्यवसायाला मोठा झटका दिला आहे. बर्ड फ्लूच्या धास्तीने चिकनचे दर सुमारे 50 ते 60 टक्‍क्‍यांनी तर विक्री 80 टक्‍क्‍यानी कमी झाली आहे. चिकनचे दर आता 60 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, देशातील सुमारे 10 राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. याची धास्ती चिकन विक्रेते व नागरिकांमध्ये पसरत आहे. परिणामी पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले असून अंडी व चिकनचे भाव कमी झाले आहेत. राज्यात परभणी, रत्नागिरी, ठाणे अमरावती व अन्य भागात कोंबडे व अन्य पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य शासनाने सुद्धा याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. आधी करोनामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागला होता. आता परत बर्ड फ्लू आल्याने नव्याने संकटाचा सामना करावा लागत आहे.

यामुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. शहरात चिकनचे दर 60 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. तर अंडी देखील दीड ते दोन रुपयांनी स्वस्त झाली आहेत. विक्रीतही मोठी घट झाली असून व्यवसाय 80 टक्‍क्‍यांनी कमी होऊन अवघ्या 20 टक्‍क्‍यांवर आला आहे. करोनानंतर आता महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने एक नवीन संकट उभे ठाकले आहे. याबाबत या राज्य शासनाकडून उपाययोजना सुरु केल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वीपासूनच बर्ड फ्लू आला असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसांपासून चिकनच्या विक्रीत आणि दरात घसरण होत आहे. गेल्या एक आठवड्यात विक्री 80 टक्‍क्‍यांनी घटली आहे. एकाच आठवड्यात शंभर रुपयांची घसरण होत बॉयलर चिकन 60 रुपये किलो झाले आहे. गावराण कोंबडीचे दरही 200 रुपयांनी कमी झाले आहेत.
– आसिफ रहमान, विक्रेता

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.