पौड : देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय सेनेचे जवान अनेकदा आपल्या प्राणाची बाजी लावून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत असतात. त्यांचे धैर्य टिकवून ठेवण्यात त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान व त्याग असतो असे मत निवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ यांनी व्यक्त केले. पौड येथे श्रीशिववसमर्थ बचत गट व पौड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांगलादेश देश विजय दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.संस्थेच्या वतीने मागील 20 वर्षांपासून मुळशी तालुक्यातील विविध गावात सातत्याने विजय दिन कार्यक्रम साजरा केला जातो.
यावर्षी पौड येथे हा कार्यक्रम विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. यामध्ये सुरुवातीला पौड बस स्थानक मैदानात राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या मुलींनी उपस्थित सैनिकांना सघोष सलामी दिली. त्यानंतर तालुक्यातील विविध गावामधुन आलेल्या निवृत्त सैनिकांची सघोष मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम स्थळी स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यानी सादर केलेल्या देशभक्तीपर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम प्रसंगी पौडचे सरपंच प्रशांत वाल्हेकर माजी सरपंच अजय कडू, प्रमोद शेलार, शिवसमर्थ बचत गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवळे, कार्याध्यक्ष विलास चोंधे, भाजपा सरचिटणीस सचीन सदावर्ते, अनिल व्यास, मा उपसरपंच रसिका जोशी ,सतीश शिंदे, संदीप पवार, प्रदीप पाटील, महेश मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंतामणी चितळे यांनी केले. सूत्रसंचालन योगेश गोसावी व राजेंद्र नाईकरे यांनी केले तर आभार अजय कडू यांनी मानले.
यांचा गुणगौरव
यावेळी तालुक्यातील सैन्यात नव्याने सहभागी झालेल्या विक्रांत विजय पोतदार (गनर अर्टिलरी) यांचा सन्मान विंग कमांडर अविनाश मुठाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर निवृत्त सैनिक रमेश म्हसू गोडांबे (नायब सुभेदार), विठ्ठल नारायणराव देशमुख (हवालदार), चंद्रकांत गोविंद खानेकर (हवालदार), सुनिल महादेव मारणे (हवालदार), विजय बाळकृष्ण धुमाळ (हवालदार)यांना व घोटावडे गावचा नवतरुण श्रेयश नवनाथ भेगडे हा सैन्यात नव्याने रुजू झाल्याने त्याच्या पालकांचा विशेष गुणगौरव करण्यात आला.