रोहितसह पाच जण आयसोलेशनमध्ये

चाहत्यांशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली

बायोबबलचे उल्लंघन केल्याचा संशय : सराव करण्यास मुभा

मेलबर्न  – नवीन वर्षाच्या निमित्ताने रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय संघातील उपकर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, नवदीप सैनी, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व खेळाडूंनी बायोबबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, खेळाडूंनी प्रोटोकॉल तोडला नसल्याचे खंडन बीसीसीआयने केले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना बीसीसीआयने म्हटले की, आमचे खेळाडू फक्‍त जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी सर्व आवश्‍यक प्रोटोकॉलची काळजी घेतली आणि काटेकोरपणे त्याचे अनुसरण केले आहे. या दरम्यान त्याचे तापमानही मोजले गेले. त्याशिवाय टेबलावर बसण्यापूर्वी ते सॅनिटायझर करण्यात आले होते.

तसेच या विषयावर जास्त विचार करण्याची गरज नाही. ऋषभ पंतने चाहत्याला मिठी मारल्याच्या प्रश्‍नावर बीसीसीआयने सांगितले की, चाहत्याने स्वतः कबूल केले आहे की त्याने उत्साहात येऊन हे सर्व केले आहे. पंतने स्वत:हून त्याला मिठी मारली नाही.

मेलबर्नमध्ये एका हॉटेलात या पाच खेळाडूंनी जेवण केले. एका चाहत्याने त्यांचे बिल भरले. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्यांच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हिडिओ त्या चाहत्याने ट्‌विट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचेही या चाहत्याने सांगितले. मात्र बायोबबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आले आहे. करोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली.

दरम्यान, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळण्यात येणार आहे. दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ सध्या मालिकेत 1-1 अशी बरोबरीत आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात चेतेश्‍वर पुजाराच्या जागी रोहित शर्माला उपकर्णधार म्हणून नेमले आहे. याशिवाय विराट कोहली सध्या पॅटर्निटी लीव्हवर असल्याने या सामन्याची धुरा कर्णधार अजिंक्‍य रहाणे सांभाळणार आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत तपास

मेलबर्नमध्ये पंतने चाहत्याला मिठी मारल्याची आधी बातमी मिळाली होती, पण नंतर त्या चाहत्याने असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण दिले; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या घडलेल्या प्रकाराबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करत आहेत. या प्रकरणात करोना संदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे का? याचा तपास केला जात आहे.

प्राथमिक उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारतीय वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रवासाच्या वेळी किंवा सराव करताना या पाच खेळाडूंना इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.