चिंबळी (वार्ताहर) – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात रविवारी (दि. 14) व सोमवारी (दि. 15) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून तो पेरणीच्या तयारीला लागला आहे. तर पहिल्याच पावसाने पुणे-नाशिक महामार्गवरील सेवा रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे तळे साचले होते.
कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे, चिंबळी, माजगाव परिसरात शनिवार (दि. 13) पासून दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होते. तर रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सुमारे एक अर्धा सुरू पाऊस बरसत होता. मात्र नंतर काहीवेळ नुसतीच भुर-भुर सुरू होती.
अर्धा तासापेक्षा अधिक वेळ झालेल्या पावसामुळे खेड तालुक्याती काही ठिकाणी रस्ते जलयमय झाले होते. या पावसामुळे परिसरात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. तर शेतकऱ्याने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, वाल, मूग पिकाची पेरणीची कामे सुरू केली आहे तर काही शेतकऱ्यांनी भात लागवड करण्यासाठी धाड (साळीची बी) टाकण्याची लगबग सुरू केली आहे.