अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग होण्यास विलंब

कर्नाटकात निरीक्षणासाठी गेलेल्या सिंचन विभागातील अधिकाऱ्याची कबुली

विजापूर (कर्नाटक) – अलमट्टी धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. गेल्या 4 दिवसांत अलमट्टीतून तब्बल 5 लाख 40 हजार क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला आहे. परंतु यापूर्वीच जास्त विसर्ग झाला असता, तर पुराची परिस्थिती नियंत्रणात आणत आली असती, असे मत महाराष्ट्रातून कर्नाटकात अलमट्टीच्या निरीक्षणासाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग होण्यास विलंब झाल्याची कबुलीदेखील दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रात बाराही महिने “सुजलाम, सुफलाम’ असणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीवर आज बेचिराख होण्याची वेळ आली आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले, तर कित्येकांवर बेघर होण्याची वेळ आली.
कालपर्यंत लाखो क्‍युसेक गतीने अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना दिलासा मिळेल, असे म्हणत असताना अलमट्टीतून आधी विसर्ग झाला असता तर ही परिस्थितीच उद्‌भवली नसती, अशी कबुली सांगली सिंचन विभागाचे उपअभियंता श्रीपाद मलघम यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून श्रीपाद मलघम हे अलमट्टीत तळ ठोकून आहेत. अलमट्टीतून किती पाण्याचा विसर्ग केला जातो, याचे निरीक्षण ते राज्य शासनापर्यंत पोहोचवत आहेत. मलघम यांच्या या धक्कादायक खुलाशामुळे महाराष्ट्र राज्य सरकार आणि कर्नाटक शासनात सुसुत्रता नसल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु आम्ही पहिल्यापासूनच सहकार्य करत आहोत, असे मत अलमट्टी धरण प्रशासनाने व्यक्त केले आहे.

अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या या विसर्गाचा फटका कर्नाटकातील कृष्णाकाठच्या 17 गावांनादेखील बसतो. कर्नाटकातल्या मुद्देबिहाळ तालुक्‍यातील मसूती आणि मुदोर गावातील अनेक घरे पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)