Allu Arjun | Allu Aravind | Pushpa 2 : साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याच्या समोरील अडचणी काही थांबायचे नाव घेईना. एकीकडे त्याचा ‘पुष्पा-2’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला या चित्रपटावरून सुरू झालेला वाद. हा वाद आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरापर्यंत पोहोचला आहे.
काल अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला होता. यावेळी त्याच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये आंदोलक अल्लू अर्जुनच्या घरावर दगड, टोमॅटो फेकताना आणि झाडांच्या कुंड्या फेकताना दिसून येत आहेत. यानंतर अल्लू अर्जुनने आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेता आपल्या मुलांसह घर सोडून सुरक्षित स्थळी गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने आपल्या मुलांना वडिलांच्या घरी पाठवले आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या घराबाहेर झालेल्या निषेधांवर अद्याप भाष्य केले नसले, तरी त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. यावरच आता अभिनेत्याचे वडील ‘अल्लू अरविंद’ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अल्लू अरविंद म्हणाले, “आमच्या घरात काय केलं ते प्रत्येकाने पाहिलंय. पण या घडीला आम्हाला विचारपूर्वक वागावं लागणार आहे. आमच्यासाठी आता कोणतीही प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
आमच्या घराजवळ येऊन जो कोणी गोंधळ निर्माण करेल. त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. अशा घटनांना कोणीच प्रोत्साहन देऊ नये. इथे मीडिया आहे म्हणून मी ही प्रतिक्रिया देत नाहीये. आता संयमाने वागण्याची ही वेळ आहे. कायद्यानुसार सर्व गोष्टी होतील.” असं अभिनेत्याचे वडील म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू या प्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मात्र त्याच दिवशी त्याला जामीनही मंजूर झाला. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती असताना एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर अल्लू अर्जुनवर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती.