मुंबई – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांना मालेगाव स्फोट प्रकरणातील सुनावणीला अनुपस्थित राहण्याची अनुमती आज कोर्टाने दिली आहे. तसा अर्ज त्यांनी कोर्टात केला होता, तो न्यायालयाने मान्य केला आहे.
एनआयए तर्फे या प्रकरणात एकूण सात आरोपींवर खटला दाखल करण्यात आला असून प्रज्ञासिंह यातील एक आरोपी आहेत. आरोग्य आणि सुरक्षेच्य कारणास्तव आपल्याला दिल्लीहून येथे नियमीत सुनावणीला हजर राहता येणार नाही असे त्यांनी कोर्टापुढे केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
प्रज्ञासिंह या सध्या विविध विकारांमुळेआजारी असून त्यांच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू असतात. कालच त्यांच्यावर मुंबईत कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत असे त्यांच्या वकिलांनी आज कोर्टात सांगितले.
त्यांच्या जीवाला धोका असल्याने मध्यप्रदेश सरकारने त्यांना सहा पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुरवली आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह प्रवास करणे जिकीरीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.