मुंबई – एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ‘रास्ता रोको’ केला होता. या विद्यार्थ्यी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभाग नोंदवला होता. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येऊन परीक्षेसंदर्भात माहिती देत आठवडाभरातच परीक्षा होणार असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे. आता एमपीएससीने २१ मार्च तारीख निश्चित केली आहे.
या आंदोलनाच्या यशानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी गरजू परीक्षार्थींना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. पडळकर म्हणाले की, सरकार म्हणत की, परीक्षा घेण्यास सुविधा नाही. २१ तारखेला परीक्षा व्हायलाच हवी. अन्यथा मी वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार आहे. अनेक विद्यार्थी सेंटरवर येऊन थांबली आहेत. या विद्यार्थ्यांना सात दिवसांचा भत्ता २० हजार रुपये द्या. तसेच विद्यार्थ्यांना दोन वर्षे वाढवून देण्याची मागणी पडळकरांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कालच निर्णय घ्यायला हवा होता. त्यांनी लाईव्हमध्ये तारीख घोषित करायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. मुख्यमंत्र्यांवर इतर मंत्री दबाव टाकत असल्याचा दावा पडळकर यांनी केला. अनेक विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येत नाही. सरकार दुतोंडीपणे वागत असल्यासा आरोप त्यांनी यावेळी केला.