‘स्थायी’ची बैठक : सात कोटींच्या विविध विषयांना मंजुरी
पिंपरी – शहरात करोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 150 रुपये भत्ता देण्यासह विविध कामांसाठी 7 कोटी 20 लाख खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.14) मंजुरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात आली. दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी पालिका कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रति दिन 150 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 3 लाख 86 हजार 250 रूपये खर्चास समितीने मंजुरी दिली.
करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी 26 कंत्राटी कर्मचारी नियुक्तीसाठी 21 लाख 86 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. सात हजार 960 रूपये दराने 500 प्लाझ्मा डोनर किट खरेदीसाठी 40 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. बालनगरी येथील 400 बेडच्या करोना केअर सेंटरला प्रतिबेड प्रतिदिन 850 रूपये दराने 3 महिने संचलनासाठी रूबी अलकेअर सर्व्हिसेसला 3 कोटी 6 लाख शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 19 मध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा विषय तहकूब ठेवण्यात आला. पुणे महापालिकेच्या वतीने सांगवी-औंधला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलासाठी तसेच, अप्रोच रस्तासाठी पालिकेचा 50 टक्के हिस्सानुसार एकूण 20 कोटी 5 लाख रूपये दिले जाणार आहे. मात्र, पालिकेने स्वत: निविदा राबविल्यानंतर त्याचा एकूण खर्च 20 कोटी 5 लाखांपेक्षा खूपच कमी होता.
अधिकचा खर्च पालिका पुण्यास का देत आहे, असा सवाल शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला. त्या संदर्भात सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करावी. तोपर्यंत हा विषय तहकूब करावा, असे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी आदेश दिले. प्रभाग क्रमांक 19 मध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा विषय तहकूब ठेवण्यात आला.