पुणे – शहरात सातत्याने वाढत असलेली करोना बाधितांची संख्या लक्षात घेता, 18 वर्षांपुढील व्यक्तींना करोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र पाठवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज अडीच हजार नवे बाधित सापडत आहेत. करोनाची दुसरी लाट आल्याचे हे चित्र आहे. शहरात सध्या 23 हजाराहून अधिक करोना पॉझिटिव्ह व्यक्ती असून आतापर्यंत पाच हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
करोना विषाणूबरोबर लढा देण्याचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहता 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना करोनाची लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गटनेते बीडकर यांनी केली आहे. या लसीकरणाच्या अभियानाची अंमलबजावणी करण्याची तसेच त्यासाठीचा खर्च करण्याची जबाबदारी घेण्यास पुणे महापालिका तयार आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबतची परवानगी दिल्यास याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पालिकेच्या वतीने पाठवला जाईल, असे सभागृह नेते बीडकर यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. यावर तातडीने निर्णय घेण्याची माणगीही बीडकर यांनी केली आहे.