नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्राथमिक परीक्षेसाठी परीक्षा-केंद्र बदलण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. “यूपीएससी’ आणि भारतीय वन सेवेसाठीच्या प्राथमिक परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांची संख्या आणि केंद्र बदलण्यासाठी विनंती करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता आयोगाने नव्याने केंद्राची फेरनिवड करण्याची मुभा उमेदवारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “यूपीएससी’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली गेली आहे.
याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग आणि भारतीय वनसेवेची मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्राच्या फेरनिवडीचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठीचे अर्ज दि. 7 ते 13 जुलै आणि 20 ते 24 जुलै या दोन टप्प्यांमध्ये आयोगाच्या संकेतस्थळावर सादर करता येऊ शकतील, असेही “यूपीएससी’च्या निवेदनात म्हटले आहे.
बदललेल्या केंद्राची उपलब्धता प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्याच्या तत्त्वाने दिली जाणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे केंद्र मिळू शकणार नाही, त्यांनी उपलब्ध असलेल्या केंद्रातून निवड करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.