सातारा, (प्रतिनिधी)- गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शासनाने सर्व वाद्ये वाजवण्यास रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक येत असतात. रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नाहीत.
तसेच मंडळांच्या गणेशमूर्ती केवळ औपचारिकरित्या शांततेने विसर्जन कराव्या लागतात. त्यामुळे सर्व गणेशभक्तांचा उत्साह व त्यांच्या भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साताऱ्यातील गणेशोत्सव मंडळांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देताना अशोक मोने, पंकज चव्हाण, महेश साळुंखे, शेखर चव्हाण, ॲड. गोकुळ सारडा, रवी साळुंखे, चंद्रशेखर घोडके, अक्षय गवळी, अभिजित बारटक्के, ॲङ शार्दुल टोपे, अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरे होणारे उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव. या दोन्ही उत्सवांना राज्यात लोकमान्यता आहे आणि शासनाने देखील राजमान्यता दिली आहे.
सातारा शहरात सुमारे २५0 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ओहत. गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचे स्वरुप बदलत आहे.
त्याबाबत न्यायालयाकडून, शासनाकडून तसेच पोलीस खात्याकडून अनावश्यक अशी बंधने घातली जात आहेत. तरुणांच्या आनंदावर विरजण पडत आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत देखावे, ध्वनीक्षेपकासाठी वेळेची बंधने घातली जात आहेत.
परंतु, ही सर्व बंधने घालताना आणि त्याची कार्यवाही व कारवाई करताना पोलीस यंत्रणा आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये योग्य तो सुसंवाद, समन्वय असावा, त्याच उद्देशाने सहा मागण्या नमूद करत आहोत. विसर्जन मिरवणूकीत बारानंतरही वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी.
विसर्जन मिरवणुकीचा मार्ग पारंपरिक जसा सुरु आहे तसाच याही वर्षी सुरु ठेवावा, कोणत्याही मंडळाला मिरवणुकीत लवकर पुढे जाण्यासाठी सक्ती करु नये, प्रशासनाने सहकार्याची भूमिका ठेवावी,
विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांकडून उत्साहाच्या भरात प्रशासनाच्या सूचनेचे पालन न झाल्यास त्यांना योग्य तशी समज द्यावी, कोणतेही कायदेशीर खटले दाखल करु नयेत, विसर्जन मार्गावरील वाहतूक वळवण्यात यावी, पार्किंगचा प्रश्न सोडवावा, त्याची सूचना अगोदर जाहीर करावी,
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी राजवाडा चौपाटी रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.