पुणे, दि. 29 – बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे फॅशन स्ट्रीट, कुंभारबावडी या बाजारपेठांमधील व्यावसायिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय स्वार्थासाठी ही परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप करत, परवानगी लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून केला जात आहे.
करोना आणि लॉकडाऊनमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाने लष्कर परिसरातील प्रमुख बाजारपेठा बंद केल्या होत्या. जून महिन्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करत परिसरातील दुकानांना तसेच शिवाजी मार्केट या बाजारपेठा पुन्हा सुरू करण्यासाठी बोर्डाने सशर्त परवानगी दिली आहे. परंतु, फॅशन स्ट्रीट आणि कुंभारबावडी या दोन्ही बाजरपेठांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील व्यावसायिकांच्या अर्थिक संकटात वाढ होत असून, बोर्डाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत फॅशन स्ट्रीट बाजारपेठ असोसिएशनचे प्रमुख भगत तौर तसेच कुंभारबावडी येथील व्यावसायिक संघटनेचे प्रमुख मुन्वर अन्सारी यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांना निवेदन दिले आहे. मात्र अजूनही बोर्ड प्रशासनाने बाजारपेठ खुली करण्यासाठी परवानगी दिली नसल्याने, दोन्ही बाजारपेठांमधील सुमारे 1,800 व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, “बाजारपेठ सुरू करण्याबाबत बोर्ड प्रशासन विचार करत असून, बोर्डाच्या सर्व सदस्यांशी याबाबत चर्चा सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात बाजारपेठ खुली करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.