प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -गणेशोत्सव परवान्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीसह महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना संबंधित परवाने देण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहत. 2019 च्या परवान्यानुसार ही परवानगी असून, 2022 ते 2027 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी हा परवाना असणार आहे.
करोनाचा कालावधी असल्याने 2019 च्या परवानाच 2020 मध्ये तसेच 2021 मध्ये कायम ठेवण्यात आला होता. मात्र, करोनानंतर आता शहरात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेश मंडळानी यंदा महापालिकेने पुढील पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात घेतलेल्या आढावा बैठकीत केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याबाबत आदेश दिले होते. मात्र, ही परवानगी कोणी द्यायची यावरून पोलीस आणि महापालिकेत एकमत होत नव्हते.
ही बाब पुन्हा महापालिकेने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मंडळांनी निदर्शनास आणून दिली. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी पाच वर्षांसाठी परवाना देणार असल्याचे जाहीर केले होते. तर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यासाठी सहमती दर्शविली होती. तसेच हा निर्णय महापालिकेने लेखी पोलिसांना कळवावा, असे निश्चित करण्यात आले होते.
23 गावांना नवे परवाने
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गणेशोत्सव मंडळांनाही पाच वर्षांसाठी परवाने दिले जाणार असले तरी त्यांना या वर्षी नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या भागातील मंडळांनी महापालिका तसेच पोलिसांकडे अर्ज करून पाच वर्षांचा परवाना घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठीची कार्यपद्धत निश्चित करून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आली आहे.