माळेगाव – शिक्षणाचा श्रीगणेशा होणाऱ्या अंगणवाड्या सुस्थितीत असणे तसेच अशी शिक्षणमंदीर गावोगाव असावीत, या उद्देशाने शासनाकडून नव्या अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त बारामती तालुक्यात 32 अंगणवाड्यांना मंजुरी मिळाली आहे. तर पूर्वी अंगणवाड्यासाठी मिळणाऱ्या 6 लाख रुपयांच्या निधीत 1 लाख 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
राज्य शसनाकडून शिक्षणाच्या विविध योजना राबविल्या जात असतानाच गरीब व आर्थिकदृष्टट्या मागास असलेल्या कुंटुंबातील मुलांचा श्रीगणेशा होणाऱ्या अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या या अंगणवाड्यांतून आता गरीबांच्या मुलांना खासगी शाळेप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. बारामती तालुक्यासाठी 32 अंगणवाड्यांसाठी 2 कोटी 72 लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीतून प्रत्येक अंगणवाडीस 8 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. या रक्कमेतून तालुक्यात नादुरुस्त, मोडक्या अंगणवाडी इमारत, उघड्यावर भरणाऱ्या इमारती आता नवीन बांधकाम मंजुरीमुळे हक्काच्या इमारतीत भरणार आहेत.
बारामतीतील मंजुर अंगणवाड्या व गावे – तरडोली (भोईटेवाडी), वंजारवाडी (गावठाण), लोणीभापकर, मुढाळे (गावठाण), कऱ्हावागज (गावठाण), जळगाव सुपे (पिंपळाचा मळा), सायंबाचीवाडी, माळवाडी (लाटे), वडगाव निंबाळकर (वडगाव पेठ), मेखळी (बरकडवाडी), शिरसुफळ (गावठाण), वंजारवाडी (चौधरवाडी), लोणी भापकर (लोणीभापकर 2), कटफळ (ढासीवाडी), साबळेवाडी (गोलांडेवाडी), गुणवडी (कुंभारवस्ती), सावळ (विरकरवस्ती), सि.निंबोडी (फडतरेवस्ती धुमाळवस्ती), ढेकळवाडी, झारगडवाडी (निकमवस्ती), धुमाळवाडी (इरिगेशन बंगला), माळेगाव (येळेमळा), मानपा वस्ती, कुरणेवाडी (सगोबावाडी), मुरूम (कदमपांद), कोराळे, खु. (कळमराज लिफ्ट वस्ती), वाणेवाडी (मळशी), करंजे पूल (गायकवाडवस्ती), वाणेवाडी (रामनगर), चांदगुडेवाडी (खंडूखैरेवाडी), मेडद (गावडेवस्ती), सोनवडी सुपे (गावठाण) या अंगणवाड्यांना प्रत्येकी 8.50 लाखाचा निधी प्राप्त
झाला आहे.
शासनाने बारामती तालुक्याकरीता सर्वाधिक अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे. शिवाय पुर्वी पेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करुन दिल्याने अंगणवाड्यांच्या विकासा बरोबरच शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे.
– मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं. स. बारामती