उत्तर प्रदेशात सपा-बसपात जागा वाटप

सपा 37 आणि बसपा 38 जागांवर निवडणुका लढणार

लखनौ – लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमिवर आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार सपा 37 आणि बसपा 38 जागांवर निवडणुका लढणार आहे. तर, पाच जागा या मित्रपक्षांसाठी ठेवणार आहेत.

लोकसभेसाठी सपा आणि बसपानं एकत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर अमेठी आणि रायबरेली येथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजपविरोधात दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. समाजवादी पक्षाकडून कैराना, मोरादाबाद, संभल, रामपूर, मेनपुरी, फिरोजाबाद, बरेली, लखनौ, इटावा, कानपूर, झांसी, बांदा, इलाहाबाद, वाराणसी आणि मिर्जापूरसह 37 मतदार संघातून उमेदवार देणार आहे. तर बहुजन समाज पक्षाकडून सहारंगपूर, अलिगड, आग्रा, सितापूर, सुलतानपुर आदी ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत.

दरम्यान, सपा-बसपाच्या आघाडीवर मुलायम सिंह यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याच पक्षाचे लोक पक्षाला संपवत असल्याचे म्हटले आहे. शिवाय, तिकीट देण्यास उशिर झाला असून पक्षातील माझं काम काय तेच कळत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजप खूपच पुढे असल्याचे देखील मुलायम सिंह यादव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मोठे यश मिळवित उत्तर प्रदेशमध्ये 70 जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी मात्र भाजपा कॉंग्रेस आणि सपा – बसपाचं थेट आव्हान असणार आहे. याशिवाय 2014 प्रमाणे 70 जागा जिंकता येतील का? ही देखील भाजपला शंका आहे. त्यामुळे भाजपने आता उर्वरित राज्यांमध्ये देखील आपले लक्ष अधिकपणे केंद्रीत केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणारे नुकसान भाजप महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालमधून भरून काढण्यावर भर देईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×