पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य कर्जाच्या गर्तेत अडकले आहे. येत्या काळात कर्मचार्यांचे पगार होतील की नाही? अशी शंका आहे. अशा परिस्थितीत केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरसकट पैशांचे वाटप करणे योग्य नाही.
ज्यांना गरज आहे, त्यांना ते मिळावेत याला आमचा पाठींबाच राहील, या शब्दांत राष्ट्रवादी कॉंंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख न करता या योजनेसह शासनाच्या अन्य योजनांवर हल्लोबोल केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या व्हिजन २०५०ची भूमिका जाणून घेण्यासाठी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पाटील यांनी त्यांच्या पक्षाची भुमिका मांडली. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मिनाक्षी गुरव व्यासपीठावर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, राजकारणी फक्त निवडणुकीपुरता विचार करू लागले आहेत. आपले राज्य देशात अग्रेसर होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून रोजगाराला प्राधान्य देताना औद्योगीक क्षेत्राचा विस्ताराला प्राधान्य दिले.
परंतू, अलिकडे उद्योगाच्या दृष्टीने मुंबईतील बंदर असतील अथवा विमानतळांना देशातून स्पर्धा व्हायला लागली असून गुंतवणुकीला पर्याय निर्माण झाले आहेत. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या भागातच उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे. पुण्यासारख्या शहरात सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याला प्राधान्य दिले. मुंबईने पहिले पाऊल उचलले आता तिथे मोठ्याप्रमाणावर जाळे विस्तारले आहे.