युती-आघाडीत मताधिक्‍क्‍यासाठी रस्सीखेच

शशिकांत भालेकर

एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची
मतदारांची सुप्त लाट कोणाच्या मागे

मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस एकवटली
झावरे लंके एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीला याचा फायदा लोकसभा निवडणुकीत किती होतो, कोणता उमेदवार मतदारांना प्रभावित करतो, सेना भाजप कॉंग्रेस अशी एकत्रित समीकरण निवडणुकीत काय कमाल करते. तालुक्‍यात असणारी मतदारांची सुप्त लाट कोणाच्या पाठीमागे जाते. यावरच डॉ. विखे व आ. जगताप यापैकी कोणाला तालुक्‍यातून मताधिक्‍य मिळते हे अवलंबून आहे.

पारनेर – निवडणूक लोकसभेची असली तरी तालुकापातळीवर मात्र आगामी विधानसभेची सेमिफायलन म्हणून पाहिले जात आहे. विधानसभेचे इच्छुक नेते या निवडणुकीत सक्रिय होऊन प्रचार करत आहेत. सध्या प्रचारामध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप तालुक्‍यातील गावन्‌गाव पिंजून काढण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. शिवसेना डॉ. विखेंचा प्रचार विखे गटांच्या (मूळ कॉंग्रेस) कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून करीत आहेत. तर दुसरीकडे गटतट बाजूला ठेवून राष्ट्रवादी एकवटली आहे. त्यामुळे पारनेर मतदारसंघात दोन्ही उमेदवारांमध्ये मताधिक्‍क्‍यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी वाटणारी एकतर्फी निवडणूक आता चुरशीची झाली आहे.

तालुक्‍यात भाजपची ताकद कमी असली तरी विखेंना मानणारे नेते व समर्थक मोठ्या प्रमाणात डॉ. विखेंच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यात शिवसेनेचे उपसभापती विजय औटी यांची मोठी ताकद विखेंना मिळाली आहे. सध्या तालुक्‍यात कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे. होती तेवढी कॉंग्रेस भाजपबरोबर गेली आहे. पारनेर तालुक्‍यामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. ना. ओटी यांनी देखील पूर्ण तालुका विखे यांच्या प्रचारादरम्यान पिंजून काढला आहे. लोकसभेत विखेंना तालुक्‍यातून आघाडी मिळावी, हा औटी यांचा हा प्रयत्न आहे. विधानसभेसाठी लोकसभा निवडणूक सेमीफायनल आहे. त्यामुळे औटी यांनी सेनेतील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्रित केले आहे. काही सेनेचे कार्यकर्ते विखेंवर नाराज होते ते देखील आता प्रचारामध्ये सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यात सेना भाजप कॉंग्रेस असे कार्यकर्ते एकत्रित डॉ. विखे यांचा प्रचार सहभागी झाले आहे.

आ. जगताप हे देखील पारनेर तालुक्‍यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा नातलग परिवार या तालुक्‍यांमध्ये आहे. त्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मोठा कार्यकर्ते असणारा पक्ष आहे, पण तालुका राष्ट्रवादी ही गटातटात विभागली गेली आहे, परंतु प्रथमच आ. जगताप यांच्या प्रचारासाठी हे सर्व नेते पदाधिकारी एकवटले आहेत. अर्थात मतभेद बाजूला ठेवले असले तरी मनभेद अजून असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. तालुक्‍यात सुजित झावरे व निलेश लंके असे दोन गट सध्या पडले आहे.मात्र, या दोन्ही गटाला एकत्र आणण्याचे काम राष्ट्रवादीच्या वरीष्ठांनी केले आहे. परंतू आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता हे दोन्ही तसे वरवर एकत्र आले आहे. परंतू असे असले तरी आ. जगताप व पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यत पोहचविण्यासाठी संधी म्हणून हे दोघेही जोमाने काम करीत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला तालुक्‍यातून मताधिक्‍क्‍य मिळाले. त्यामुळे याही निवडणुकीत भाजप उमेदवाराला आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद असल्यामुळे त्याचा फटका उमेदवाराला बसला होता, परंतु यावेळी तालुका राष्ट्रवादी एका छत्राखाली आल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रयत्न देखील आघाडी मिळवण्याचा असणार आहे. सामान्य मतदार मात्र दुष्काळाच्या संकटामध्ये आहे. जनावरांच्या छावण्या जरी सध्या सुरू असल्या तरी आर्थिक संकटात बळीराजा सापडलेला आहे. त्याचबरोबर नवीन मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. नवीन मतदाराला कोणता पक्ष आपल्याकडे आकर्षित करतो, त्यावर तालुक्‍यातील कोणा एका पक्षाला आघाडी मिळेल हे ठरले जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.