निकालांनंतर काँग्रेस-राजदचं फाटलं? राजद नेत्याचे काँग्रेसवर गंभीर आरोप

पटना – बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकाल जाहीर झाल्यापासूनच काँग्रेसचा फटका मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला बसल्याचं बोललं जात होत. अशातच आज राजद नेत्याने याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. ‘ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष चालवला जातोय त्याचा थेट फायदा भाजपलाच होतोय असे आरोप लावले जाऊ शकतात’ असं खळबळजनक वक्तव्य राजद नेते शिवानंद तिवारी यांनी केलंय.

एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना तिवारी यांनी, “ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष चालवला जातोय त्याचा थेट फायदा भाजपलाच होतोय असे आरोप लावले जाऊ शकतात. बिहार विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार जोमात असतानाच राहुल गांधी मात्र प्रियंका यांच्या शिमल्यातील विश्रामगृहामध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. पक्ष असा चालवला जातो का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला.

तिवारी यांनी यावेळी बोलताना महाआघाडीसाठी काँग्रेस पक्षच अडथळा बनल्याचा आरोप लगावला. त्यांनी, “काँग्रेसने विधानसभा निवडणुकांमध्ये ७० जागा लढवल्या मात्र या जागांसाठी त्यांनी ७० सभा देखील घेतल्या नाहीत. राहुल गांधी ३ दिवसांसाठी आले, प्रियंका गांधी आल्याचं नाहीत. ज्यांना बिहारच्या राजकारणाविषयी कसलीही माहिती नाही त्यांनाच इथं पाठवण्यात आलं. हे योग्य नाही.” अशा शब्दांमध्ये आपली नाराजी जाहीर केली.

“काँग्रेस पक्षाची ही वागणूक केवळ बिहार निवडणुकांपर्यंतच मर्यादित आहे असं नाही. इतर राज्यांमध्येही काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्यास उतावीळ असते मात्र ते जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू शकत नाहीत. याबाबत काँग्रेसने विचार करायला हवा.” असंही ते म्हणाले.


काँग्रेस नेत्यांच्या नाराजीचाही उल्लेख

यावेळी बोलताना तिवारी यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये घडलेल्या लेटर बॉम्बचा देखील उल्लेख केला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर उचललेलं बोट योग्यचं असल्याचं तिवारी यांनी म्हंटल.

दरम्यान, राजद नेत्याच्या या टोकाच्या वक्तव्यांमुळे  विधानसभा निवडणुका एकत्र लढवलेल्या काँग्रेस-राजदमध्ये दुरावा निर्माण झालाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.