ऍलर्जी ( भाग १ )

डॉ. स्वप्निल सुतार

मला त्याची ऍलर्जी आहे, असे आपण नेहमी ऐकतो. कोणाला कशाची ऍलर्जी असेल काही सांगता येत नाही. माझी नातेवाईक आहे, तिला शेवग्याच्या शेंगांची ऍलर्जी आहे. कधीही घरात शेवग्याच्या शेंगांची भाजी केली, तर ती किचनमध्ये पाऊलसुद्धा टाकत नाही. कधी चुकून शेवग्याची शेंग वा अगदी शेवग्याच्या शेंगेच्या भाजीचा रस्सा जरी खाल्ला, तरी तिच्या अंगावर पुरळ उठते. कोणाला धुऴीची ऍलर्जी असते. एखाद्याला एखाद्या वासाची वा सेंटचीही ऍलर्जी असू शकते. माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्‌सनाही औषध देण्यापूर्वी विचारावे लागते, की कशाची ऍलर्जी तर नाही ना? कारण अनेकांना विशिष्ट औषधाचीही ऍलर्जी असू शकते, असते. अँटिबायोटिक्‍सची ऍलर्जी असणारेही पेशंटस असतात. तशी ऍलर्जीची यादी फार मोठी आहे. काही माणसांना काही माणसांचीही ऍलर्जी असते. त्यांनी त्यांना पाहिले की लगेच डोके ठणकू लागते. हा झाला गमतीचा भाग.

सामान्यत: ऍलर्जीचे काही ठरावीक प्रकार आढळतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे

फिव्हर- ऍलर्जी चा हा प्रकार परागकण अथवा इतर सूक्ष्म घटकांमुळे दिसून येतो यात सर्दी, खाज सुटणे, आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्‍ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात

रॅश-काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात, किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणुजन्य ऍलर्जीमुळे, ताणताणावामुळे, सूर्यकिरण किवा तापमानातील बदलामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात
वनस्पतीची ऍलर्जी – काही वनस्पती, बागकामाचे साहित्य इत्यादीच्या संपर्कात आल्यास याचा त्रास होऊ शकतो

कीटकांचा चावा – मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यांसारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना ऍलर्जी येऊ शकते. या कीटकांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे अल्प वेदना, सूज, लाली वैगेरे येऊ शकते

पेट ऍलर्जी – काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक संरक्षण संस्था प्राण्यामधील ठराविक प्रथिनाप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा आशा प्रकारची ऍलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, शिंका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात.

लैटेक्‍स ऍलर्जी – रबरामधील प्रोटीनमुळे काही व्यक्तिना ऍलर्जी येते, यामधे सर्दीपासून ते तीव्र प्रकारच्या ऍलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात , पातळ अथवा जास्त ताणले जाणारे रबर म्हणजे फुगे, हातमोजे यातील रबर मधे प्रोटीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे काहिना ऍलर्जी चा त्रास संभवतो

बुरशीची ऍलर्जी – यामधे प्रामुख्याने इनडोर अणि आउटडोर अशा बुरशीच्या स्पेसीज असतात. बुरशीचे बीजकण श्‍वसनामार्फत शरीरात गेल्यास शरीर संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त होते. परिणामी कफ, डोळ्यांना खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमादेखील अशा ऍलर्जीमुळे होतो.

सौन्दर्यप्रसाधनांची ऍलर्जी – मॉइश्‍च्चराइजर, शाम्पू, डिओ, मेकअपचे साहित्य, कोलेजेन्स, आणि इतर सौन्दर्य प्रसाधने अनेकदा त्यातील सुगंध, प्रीझर्वेटिव्हजमुळे ऍलर्जिक रिएक्‍शनला कारणीभूत ठरतात

औषधांची ऍलर्जी – औषधांच्या ऍलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाची ऍलर्जी असणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. सौम्य खाज सुटणे, किवा सौम्य साइड इफेक्‍ट्‌स म्हणजे उलट्या होणे किवा अन्नावरील वासना उड़ण्याबरोबरच अंगावर बारीक़ बारीक़ पुरळ उठते.

सिलम सिकनेस – हा औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा ऍलर्जीचा प्रकार आहे. अशी ऍलर्जी एका आठवड्यानंतरही येते.

एखादी लस दिल्यानंतर अशा प्रकारची ऍलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्स, आकडीसाठी येणारी औषधे, इन्सुलिन, आयोडिनेटेड एक्‍स रे कॉन्ट्रास्ट डाइज इत्यादी औषधांमध्ये ऍलर्जीसाठी कारणीभूत घटक असू शकतात.

एक्‍झिमा – हा त्वचेवर खाज निर्माण करणारा ऍलर्जीचा एक प्रकार आहे. काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते.

एक्‍झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात्‌ येणारे काही सर्व सामान्य घटक म्हणजे साबण, प्रसाधाने, कपडे, डिटर्जेंट, दागिने आणि घाम!

डोळ्यांची ऍलर्जी – ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यांसारखी लक्षणे दिसतात परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या अंगावरील सूक्ष्म कण यामुळे ही ऍलर्जी होऊ शकते

दुधाची ऍलर्जी – दूध आणि दुधाची उत्पादने काही व्यक्तींच्या एलर्जीस कारणीभूत ठरू शकतात. त्यांना उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात मुरडा मारणे अशी लक्षणे दूध किवा दुग्धजन्य पदार्थ सेवनाने लगेच दिसतात.

 

ऍलर्जी ( भाग २ ) 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×