पुणे – वानवडीत पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या महिला संघटनेकडूनही तसा आरोप केला जात आहे. यातच कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये “एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय,’ असे संभाषण आहेत. तो आवाज संबंधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे वानवडी पोलीस ठाण्यात पूजाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या घरच्यांनी आत्महत्येसंदर्भात कोणालाही दोषी धरले नाही.
या ऑडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला “तरुणीच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे’ असे सांगत आहे. यावरुन तरुणीने आत्महत्येपूर्वी एक व्यक्ती तिच्या सोबत होता आणि दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत होता. तसेच संबंधित व्यक्तींना ती तरुणी आत्महत्या करणार असल्याची माहिती होती. त्यावर, “त्या तरुणीला समजावून सांगा’ असेही तरुणीसोबतचा व्यक्ती फोनवरील व्यक्तीला सांगत होता. त्यावर फोनवरील दुसरी व्यक्ती “तिला डॉक्टरकडे घेऊन जा’ असे सांगते. त्यानंतर, “तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाते, पण नंतर मी आत्महत्या करणार,’ असे तरुणी म्हणतेय असे तो व्यक्ती सांगत आहे.
दरम्यान, या दोन व्यक्तींमधील बंजारा भाषेतील संवादाची आणखी एक क्लिप समोर आली आहे. या क्लिपवरुन तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्यासोबत एक व्यक्ती तिथेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील दुसरी व्यक्ती “तिचा मोबाइल काढून घे’ असे सांगत आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पूजा चव्हाणच्या आत्महत्येसंबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. पूजा ही दोन मित्रांसोबत नुकतीच वानवडीमध्ये राहायला आली होती, असे पोलीस सांगतात. मात्र, त्या रात्री नक्की काय घडले? हे मात्र सांगण्यास नकार दिला जात आहे.