जयंत पाटील शांत, मी तापट स्वभावाचा

मुख्य सचिव कुंटे यांच्याशी वाद झाल्याचे आरोप तथ्यहिन ः अजित पवार

पुणे – राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करताना, जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे.

त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादाच्या चर्चेत काहीच तथ्य नाही, असे सांगत पवार यांनी पाटील-कुंटे वादावर पडदा टाकला. जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते.

त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहिती आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. दरम्यान, इंदापूर पाणी वाटपाबाबत त्यांना विचारणा केली असता, ज्यांचा जेवढा पाण्यावर अधिकार आहे, तो काढून घेणार नाही.

या पाणीप्रश्‍नाला उगाच फोडणी देण्याचे काम सुरू आहे. न्यायालयात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र वस्तुस्थिती काय आहे हे इंदापूर आणि सोलापूरमधील नागरिकांनी समजून घ्यावे. कोणावरही अन्याय होणार नाही, हा माझा शब्द आहे.

काही लोक राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने हा प्रश्‍न पेटविण्याचा प्रयत्न करत असून, त्याला फसू नका, असेही पवार यांनी सांगितले. मंगळवेढा निवडणुकीबाबत बोलताना, विरोधी पक्षाने सर्व मते एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तरीही मागच्यावेळीपेक्षा अधिक मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडली. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत जो चमत्कार झाला, त्यामध्ये आम्ही पडलो, असे पवार यांनी सांगितले.

आमदार लंके यांना तातडीने फोन
यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी अजित पवार यांच्याकडे चेक सुपूर्द केले. या चेकची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन अजित पवार यांनी संबंधितांना पावती आणि आभार मानणारे पत्र देण्याच्या सूचना केल्या.

त्यानंतर एक दिव्यांग कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने पवारांच्या हातांमध्ये एक चेक ठेवला. चेकवर नाव होतं नीलेश लंके फाउंडेशन आणि मदत होती 2 हजार 100 रुपयांची. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार नीलेश लंके यांना फोन केला आणि तुझं काम चांगलं सुरू आहे, असं म्हणत शुभेच्छा दिल्या.

शेतीची कामे थांबणार नाहीत
लॉकडाऊन असले तरीही शेतीच्या कामाला कुठेही थांबविण्यात आलेले नाही. पुढील महिन्यात पावसाला सुरवात होईल. त्यामुळे बी-बियाणे, औषधे यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यासह राज्यात नियोजन करण्यात आले आहे.

शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतोय. त्यामुळे कोणत्याही कामाला बंधन नाही, परंतू, नियमावलाचे तंतोतंत पालन करून ही कामे करायची आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.